तुझी सय येता
तुझी सय येता
तुझी सय येता आई
मज राहवले नाही
अश्रू मावेना नयनी
भेट देई लवलाही
तुझ्या वाचून भिकारी
होय लेकरू अनाथ
तुझ्या मायेची वाकळ
देते आयुष्याला साथ
आई माझ्यासाठी सदा
केला पाळणा हाताचा
दिवा पापणीचा दावी
मार्ग मला आयुष्याचा
डोळ्यापुढे माझ्या तुझी
मूर्ती सदैव रहावी
जेवणाच्या आधी आई
डोळा भरून पहावी
तुझे उपकार आई
माझ्या डोई कोटी कोटी
पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा
वाटे मला तुझ्या पोटी
