‘ती' ची व्यथा…
‘ती' ची व्यथा…
दुमदुमलंय हे घर, सर्वांची मने झालीत तृप्त,
येणार आहे घरी नवा पाहुणा, त्याची ओळख मात्र लुप्त
करवून घेतली चाचणी, समजलं येणार आहे पणती,
पण हवा होता दिव्याचा झगमगाट, म्हणून मला मात्र पाडली.
संसार ही तारेवरची कसरत असते, हे लग्नानंतर खरं कळतं,
तडजोड करताना मि विसरते, माझ मनं हे किती जळतं.
चार भिंतीतलं माझं आयुष्य, हे गुलामाच्या दावनीला बांधलेलं,
स्वप्न, इच्छा, आकांक्षा, यांना मुरड घालून, स्वत:ला विसरून जगायला लावलेलं.
सासरी सुरू झाला छळ, निमित्त होते, ‘लेकीसोबत धाडले नुसते आंदण’,
अक्षरश: कीव आली मला या लोकांची,
कारण, माझ्याशी लग्न केल्याचे, मागत होते ते मानधन.
कोणी काहीही बोलायचं, तर कोणी कसंही मारायचं,
सगळं काही गप्प बसून, मी नुसतंच सहन करायचं,
म्हणलं, मी जर जास्त ताणलं, तर हे माझ नातंच फाटायचं.
शिकून-सवरून, स्वत:च्या पायावर उभी राहून, जबाबदारीने पुढे चालते,
कष्टाने मिळवलेल्या यशाची चव चाखताना, खंत मात्र एका गोष्टीची वाटते,
का या समाजातील वाईट नजर, माझ्या स्वातंत्र्याला छेदते?
कधी मला मांगल्याचं प्रतीक मानतात, तर कधी लक्ष्मीचं रूप म्हणून मिरवतात,
कधी मला माता-भगिनींचा सन्मान देतात, तर कधी माझा करमणुकीसाठी वापर करतात,
माझ्या आत्मसन्मानाची चिरफाड करतात,
मला कलंकित समजून, स्वत: मात्र समाजात उजळ माथ्याने वावरतात.
चेहऱ्यावर त्रासिक भाव, निस्तेज मुद्रा आणि मनात संतापाची लाट उसळत असताना,
इज्जतीपोटी आवर घालते, मी माझ्या डोळ्यातील रागाला,
जेव्हा सामना करावा लागतो, मला नकोशा, किळसवाण्या त्या स्पर्शाचा.
मी आणि माझ्यासारख्या कित्येक जणी, तेव्हाच मोकळा श्वास घेऊ,
जेव्हा आळा बसेल, पुरूषी भोगवादी मानसिकतेला.
जीवन हा एक संघर्ष आहे, यात वादळे ही येणारंच,
समजावताना म्हणते मी स्वत:ला, ‘मी नाराज नाही होणार’.
दाखवून द्यायचंय मला या जगाला, स्त्री ही काय आहे,
म्हणून येणाऱ्या प्रत्येक वादळासमोर, मी स्वत: एक वादळ बनून उभी राहणार
मी स्वत: एक वादळ बनून उभी राहणार...
