ते नशीबालाच दोष देतात...
ते नशीबालाच दोष देतात...
गाईच्या सडातून धार पिळताना,
बाप मायकड पहात मिशिवर ताव द्यायचा...
तवा शेणानं भरलेल्या हाताकड माय पहायची,
अगदी पहिल्यांदा लागलेल्या मेहंदीसारखं लाजत...
बाप मर्द होऊन,लंगोट बांधून
गाव जत्रेत हुक भरत पैलवान व्हायचा
अन माय पाटलाच्या बाईवानी मिरवायची समद्या जत्रेत...
मी पण बापासारखाच रगेल होऊन
अर्ध्या रात्री रान भिजवायला जायचो
चांदणं पडलेल्या बाजारात मोठे स्वप्न विकायचो
बापाच्या फुशारकीत पुऱ्या गावकुसात मिरवायचो...
पाभर धरलेल्या मुठीत नेहमी सोनं दिसायचं
रान तवा पंचक्रोशीत कुबेरागत हसायचं
घरातल्या उतरंडीतलं परवरभर सांडायचं
आबादानीत माझ्या बापाचं घर रोज नहायचं
बापाच्या काळात बरेचजण मास्तर, जमादार
अन शिपाई व्हायचे म्हणं शाळा शिकून,
बाप मला त्यांच्यासारखं बनवायला
गुरुजीकडं घेऊन जायचा...
तवा माय माझा मुका घेऊन बापाकडं बघायची
अन बापाचा जीव वाघासारखा व्हायचा....
अंगातला रगेलपणा वयासोबत निघून जात
हळूहळू शाळा शिकत गावचा रस्ता दूर झाला
अन गावही दूर झालं त्याच्याच माणसापासून...
खाजगीककरणात गेलेल्या जमिनीवर
आता दरवर्षी डांबर पिकतं
दुधाच्या पैशावर कसंबसं राशन मिळतं
गावच्या जत्रेत बापाच्या पैलवानकीचं सरण जळतं...
पाटलीनीचा तोरा आता
घाण ठेवलाय सावकाराकडं
अन बाप माझा विकलाय आता
महिन्यावारी कारखान्याच्या फाटकापुढं...
आता दूध पिळताना बाप मिशिवर ताव देत नाही
अन माय माझी लोकाच्या घरात शेण काढताना लाजत नाही...
मी अजूनही शिकतोय वर्गात
दहा गुणांच्या कमाईसाठी "जागतिकीकरण!"
बापानं घाट घातलेल्या स्वप्नासाठी मागच्या बेंचवर...
अन माय-बाप रोज जगतायत तेच
आभाळ फाटलेल्या ,रान पेटलेल्या मातीवर खाजगीकरण,उदारीकरण आणि जागतिकीकरण...!
त्यांना या उदात्त "मोनोपॉलीचा" थांगपत्ताच नाही,
ते नशिबालाच दोष देतात...