संसार सागर
संसार सागर
संसार सागरात भरल्या
सुख-दुःखाच्या जीवन लाटा
शिंपल्यातील मोती शोधण्या
उधळून देई सागर वाटा
हसऱ्या क्षणांना सोबत
किनाऱ्यावरील हळवा साठा
भावनांना गुंतवूनी मनी
हुंदक्यांना भरूनी काठा
लपवूनी अश्रू पापणीतले
हसरे दुःख ते करूनी मोकळे
मनाला या स्वतःच छळूनी
वेदनेचेही साजरे करूनी सोहळे
शब्दांचे आधार पोकळ
अधांतरी सोडूनी जीवास
स्वतःलाच मग मारूनी मिठी
मोकळे करूनी अपुले श्वास
छळूनी निरागस जाणीवांना
रूतले कितीदा बोल खडे
हसऱ्या जखमांनी सांडले
वाटेवरती लाल सडे
अश्रूंची ओंजळ करूनी रीती
एक उसासा घ्यावा भरूनी
हसवुनी पुन्हा वेदनेला
पुन्हा जगावे पुन्हा मरूनी
