तुझ्या सरणावर...
तुझ्या सरणावर...
तुझ्या बाप भावाने
सौदा तुझा केला,
नगदी पैशात त्यांनी
विकले आज तुला.
तुझ्या मरणाचं
नव्हतं कुणास दुःख,
तुझी किंमत त्यांना
हवी दहा लाख.
तुला नाही मिळाली
सणाला साडीचोळी,
तुझ्या सरणावर
घेतली भाजून पोळी.
तुझ्या मृत प्रेताची
केली किती नासाडी,
नाही अखेरची मिळाली
तुला माहेरची साडी.
साऱ्या जगाने पाहिले
त्यांनी भाड खाल्ली,
दोन अश्रू ही कुणाच्या
नयनात नाही आली.
तुझ्या मरणाने सारे
ते लाखात खेळतील,
खावून पिऊन खुशीत
रस्त्यावर लोळतील.
हैवान,दलाल, मुर्दाड
स्वार्थी केवढी नाती,
तुझ्या आत्म्यास कशी
मिळेल का शांती....
चांगल्याच्या पोटी
जन्म घ्यायला
भाग्य असावं लागत,
पाप पुण्य सारेच
इथे भोगावं लागत...
मड्याच्या टाळूवरचे
लोणी लोक खाती,
व्वा रे तुझा जन्म
अन् तुझी ही नाती...!
जितेपणी तुला
नव्हतं तुझं माहेर,
मरुन तूच केलंस
लाखोचं त्यांना आहेर.
तुझ्या सरणावर
पेटली त्यांची चूल,
जितेपणी, मेल्यावरही
कसे केले तुझे हाल....