समतेच्या पावसाची वाट
समतेच्या पावसाची वाट
समतेच्या पावसाची वाट
माणुसकीच्या दुष्काळाने
मानवी प्रेमाची तळी आटली,
अहंकाराच्या मीपणाची
काटेरी झुडपे मनात दाटली...
आपुलकीचा ओलावा हरवला,
धनसंपत्तीच्या महापुरात;
नात्यांवर स्वार्थाचा थर चढला,
माणूस हरवला माणसात!
गैरसमजांचे वादळी वारे
मनामनांत घोंघावले,
विश्वासाची हिरवी झाडे
मुळासकट उन्मळून पडले...
मातीच्या संपर्कात येताच
जातीचे विषारी खत मिसळले,
माणुसकीची सुपीक जमीन
भेदभावाने प्रदूषित झाले...
जन्मतःच कुणाच्या वाट्याला
सुविधांचे उंच महाल,
कुणाच्या वाट्याला मात्र
संघर्ष, उपेक्षा आणि हाल...
मूलभूत हक्कांसाठी आजही
सामान्य माणूस झगडतो आहे,
अन्यायाच्या अंधारातून
परिवर्तनाची वाट चालतो आहे...
नको कुणाच्या रक्तात जात,
नको मनामध्ये भेदभाव;
माणुसकीच्या मंदिरामध्ये
प्रेमाचाच असू दे देवभाव!
नको धर्माच्या नावावर भिंती,
नको द्वेषाचे राजकारण;
एकतेच्या मातीमध्ये रुजू दे
समतेचे नवे रोपटे सुंदर!
ज्यांच्या डोळ्यांत स्वप्नं आहेत,
त्यांना आकाश मिळू दे;
ज्यांच्या पायात काटे आहेत,
त्यांना विकासाची वाट मिळू दे...
शिक्षण, आरोग्य, रोजगाराची
समान संधी मिळू दे;
शेवटच्या माणसाच्या ओठांवर
समाधानाचे हास्य फुलू दे...
आज कोरडी झाली मने,
आज कोरडी झाली नाती;
चला, प्रेमाच्या पावसाने
भिजवूया माणुसकीची माती!
आपणच मेघ होऊया आता,
आपणच प्रेमाचा वर्षाव करूया;
जात-भेदाच्या भिंती पाडून
समतेचा नवा समाज घडवूया!
विकासाच्या प्रतीक्षेत उभा समाज
आजही आभाळाकडे पाहतो आहे;
माणुसकीच्या कोरड्या धरतीवर
समतेच्या पावसाची वाट पाहतो आहे...!
— डॉ. गणेश तुकाराम पुंडे
