समीकरण
समीकरण
माझे असे
सारे काही
माझ्यापुरतेच राहीले
त्या निळसर डोळ्यात
गुपितांच्या माळेतला
एक मोती हरवलाय
निलनदीच्या पाण्यात
तरी हिरवळीतली फुलपाखरे
मनाच्या हिंदोळ्यावर
चढउतार का करतात आणि
अस्तास जाणाऱ्या सुर्यालाही
क्षितीजाचे पंख मनभरुन का
साथ देतात..
माझे असे
सारे काही ..माझ्यापुरतेच घडले
तरी परत परत आठवतात..
तेच झोके
त्याच सावल्या
तीच अजाण भाषा
अगतिक होते मौनात...
मग करून घेते अधिकउणे
सारे माझे
तुझ्यापुरते..तुझ्यासाठी
तरी मीच बाकी राहते
कातरवेळी..नदीकाठी
न विचारलेल्या
प्रश्नांच्या ..उत्तराच्या
समीकरणात...!

