सखे
सखे
जपावे किती काळजाला सखे
कळेना कसा वार झाला सखे
नशीली नजर अन् नशीले अधर
विसरलो कसा या जगाला सखे
तुझ्या आठवांनी झरू लागलो
कसा आवरू पावसाला सखे
नसावी जिव्हा गोड इतुकी कधी
बिलगतात मुंग्या गुळाला सखे
जरी गुंतला जीव माझा तुझा
फुकाचा तमाशा कशाला सखे
किती वक्र चालायला लावते
यशाची नशा माणसाला सखे
तुला भेटण्याची मनी लालसा
कधीचा उभा दर्शनाला सखे

