शरणगीत !!
शरणगीत !!
असा कसा रे पर्जन्या
अदभुत दावशी कीमया
बरसवशी कधी ममता
धारण करिशी का कधी क्रोधा ?!!
कधी करिशी स्पर्षांनं
सृष्टी सारी हिरवीगार
कधी रागावून पार
करिशी सारे का उजाड ?!!
संप जणू पुकारुनी
कधी गडप का रे होशी ?
वसुधेच्या अंकुराशी
कधी का रे करपवशी ?!!
धरणीचं तुजवीण जीनं
भारी होई केविलवाणं
अशावेळी तू बरसून
शांतवी रे तिचे मन !!
कधी होशी तू तारक
कधी का होशी मारक?
क्रोधे होवूनी वाहक
ठरशी का शोकांचे स्मारक ? !!
भुमीच्या या लेकराला
देशी तूच रे आधार
मग दुष्काळाचा असा
का रे करिशी आघात ? !!
कधी कोरडा दुष्काळ
कधी ओला रे दुष्काळ
करण्या भू वरी सुकाळ
समाधानी कर सकाळ !!
करुन प्रलयाचा हा:हा:कार
नको दावूस चमत्कार
करुनी विनयी नमस्कार
अर्पिते शरणागतीचा सुर !!
