सहजीवन
सहजीवन
सनईच्या मंजुळ सुरात
काव्याक्षतांच्या वर्षावानं,
एकमेकांच्या संमतीने
सुरू झाले सहजीवन...
आज झाली कितीक वर्षे
आपण नांदलो छान हर्षे
चांगल्या वाईट अनुभवाने
संसार फुले वर्षोनी वर्षे...
लोणच्यासारखे मुरलो आपण
गोडी अधिकच वाढली
संसारी,
आजवरीचा फुलला संसार
समर्पित करते तुझ्यावरी...
आवडी निवडी जरी भिन्न असल्या
एकमेकांचा आदर राखतो,
समजुतीने, रुसत, मनवत
आश्चर्याचे धक्के देतो...
सुख-दुःखाचे रेशीम धागे
नाजुकपणे हाताळतो,
आयुष्यरूपी जीवन नौकेत
सुखाने प्रवास करितो...
स्वामी समर्थांचे वरदहस्त
माता-पित्यांचे आशीर्वाद,
संसाराच्या क्षितिजावरही
सहवासाची रेशीमगाठ...
संस्कृती अन् परंपरेचा
आदर आपण राखितो,
पुढील सुखी जीवनासाठी
आशीर्वाद आपण मागतो...

