सांजपाखरे.....
सांजपाखरे.....
सांजपाखरे बसले निवांत त्याक्षणी
एकमेका समजता, जन्माजन्मीचे ऋणी
जीवनी चढ-उतार, कडू-गोड आठवणी
भूतकाळ सरता सरे होई पाठवणी!!१!!
कवळीतून हसे रूप तुझे खुदकन
नजरेची भाषा अबोल असा हा क्षण
न बोलता बोले ते चंचल मन
एकमेकां समजता समजता हरपले भान!!२!!
सुख- दुःखासह आली गेली अनेक पळे
वेलीवरची गोड फुले, रूपे बदलती झाली फळे
संसारातील कर्तव्याची गोडी या क्षणी कळे
कुटुंबवृक्ष होऊन जमा झाली सगळे!!३!!
मावळत
ीच्या प्रवासातही प्रेम रंगे खुलती
दवा- पाणी आहाराची काळजी एकमेकां घेती
राजाराणी सारीपाटाच्या खेळाची संगती
संसाराची होई ही नव्यानेच प्रगती!!४!!
जोपासू या राहिलेला अपूर्ण तो छंद
प्रेमाचा झाला हा मुरूनी गुलकंद
संसारी परिपाक झाला हा मकरंद
साथ देता देता होई तो आनंद!!५!!
गोड गुपिते रुसवे-फुगवे हा तुझा अबोला
गुजगोष्टी करता करता तू मला उमगला
प्रेमाचा राहो हा अविरत तजेला
संसार आपला हा असा सजला!!६!!