सागराच्या आत
सागराच्या आत
कधीतरी फुरसतीत
समुद्राच्या अंतःकरणात शिरावे
समजून आणि जाणून घ्यावेत त्यातील बारकावे!
असीम अंतःकरण व्हावं
त्याच्यासारखं!
फेसाळता आलं पाहिजे,
तितकंच घन गंभीर ही,
भरती ओहोटी अविभाज्य असावी,त्यांच्यासारखी!
असीम किनारा असावा
अनंत लाटांना झेलणारा!
खोल खोल शिरता आलं तर
पाहता येतील,त्याच्या आतले
प्रचंड महाकाय ध्वंस!
पहावं उमलतांना त्याच्या किनाऱ्याच्या वाळूवर
रेघांनी स्वप्न चितारणारं द्विगुल,
एकदा फुरसतीत शिरावं
समुद्राच्या अंतःकरणात!
जागावं त्याच्या मिठाला!
एकदा फुरसतीत शिरावं सागराच्या अंतःकरणात
वाचून घ्यावीत त्यांच्यातली
खलबतं!!
करावा प्रामाणिक प्रयत्न
निदान त्याच्या आसपास तरी
पोचण्याचा!
एकदा कधीतरी फुरसतीत!
