रात्रीच्या वेळी
रात्रीच्या वेळी


प्रकाशवेड्या रात्री नदी किनारी पाण्यात
रमली होती ती आपले प्रतिबिंब पाहण्यात|
पाहण्यासाठी तिचे सौंदर्य, सर्व जमली होती
नभांगनी चंद्र ताऱ्यांची, मैफल जमली होती||
चांदण्यांशी बोलता मी, विषय तूच होती
चंद्रप्रकाशाचा तेव्हा आशय तूच होती|
भेटतेस अशीच तू, मला चंद्ररुपाने
उधळतेस मजवरी प्रेम, चांदणे रोज तू नव्याने||
तू म्हणतेस चंद्र ताऱ्यांत हरवून जाऊ रात्ररात्र
तुझा नि माझा श्वास एकत्र करू नाममात्र|
होता अंधकार सर्वत्र, वाट एकटीच होती
चालताना मला साथ फक्त तुझीच होती||
स्वप्नांचे मनोरे तुझे, चांदण्या संग होते
रातराणीचा गंध तुझ्या मिठीत बंद होते|
मोहक स्मित मधुर, ओठी तुझ्या उमटते
तुझ्या आठवणींची वेल मग मला बिलगते||