रास प्रीतीचा
रास प्रीतीचा
येता सांज समयाची साद , मधुबनात गुंजती पाव्याचे स्वर |
पडता कर्णी अलगुजाची मंजुळ लय , राधेचा जीव होई कातर ||
निळ्या सावळ्या सख्यासंगे रासलीलेची पाहे राधाराणी वाट |
लगबगीने सख्या मग घालिती सुंदरीच्या शृंगाराचा थाटमाट ||
कुणी रचिती मेहंदी , तर कुणी निवडती वस्त्रे सुंदर |
क्षणाक्षणाला घटत जाई केशव अन् राधिकेच्या मिलनातले अंतर ||
लेऊनी कुंकुमरंगी वस्त्रे राधिका घाली आभूषणांना हात |
परिधानताना प्रत्येक अलंकार , मोर नाचती मनात ||
नाजूक पायी रत्नजडित पैंजण करती किणकिण |
घुंगराची हरेक ताल विणत जाई कृष्णाच्या प्रेमाची विण ||
सुवर्णाचा गं मेखला बाई अलवार कटीवरी सजला |
मिलनासाठी आतुर अनंताचा वेणू पुन्हा वाजला ||
नानाविध अंगुष्ठीका दोहो करांच्या बोटी सजल्या |
दोघांच्या सुरस मिलनकथा मग चौफेर गाजल्या ||
दोन्ही बाहुंवरी शोभती पाचूजडित बाजूबंद |
रासलीला पुन्हा एकदा रंगणार म्हणुनी पंचक्रोशी झाली धुंद ||
कंठी राधेच्या विराजला मौल्यवान तो लक्ष्मीहार |
केतकीसम रंगावरी खुलूनी आली लावण्याची बहार ||
नक्षीदार ती नथणी नासिकेचे सौंदर्य खुलवी |
खुलणारे सौंदर्य पाहुनी दर्पणी राधा प्रसन्नचित्ते मान डोलवी ||
राजीवापरी कोमल अधरी चढविली सख्यांनी हळूच मग लाली |
रासक्रिडेची मग ती ललना मनी योजना करिती झाली ||
मोहक नयनांत उमटली चित्त चोरणारी ती काजळ रेखा |
प्रियतमा दर्शना उतावीळ तो दामोदर मारी अधिरतेने हाका ||
भृकुटीमध्ये स्थान दिधले मग रेखीव त्या कुंकुमास |
सख्या म्हणती गे राधे , आज संकर्षण होई तुझा दास ||
काळाभोर विपुल केशसंभार सख्यांनी मग वेण्यांमध्ये गुंफला |
येता मिलनाचा क्षण समीप , राधेचा श्वास कंठी गुंतला ||
वेण्यांत असंख्य ते सुमनांचे स्थानापन्न झाले गजरे |
कृष्णाच्या राधिकेचे रूप मग अजूनच झाले साजिरे ||
बिंदी अन् चुनरीने मग हळूच पटकाविले माथ्यावरती स्थान |
कधी पाहू मी माझी सालंकृत ती राधा म्हणुनी वृद्धिंगत जाहली कन्ह्याची तहान ||
अखेर आला मिलनाचा तो क्षण ज्यासाठी थोपविले होते पंचप्राण |
न्याहाळीती एकमेकांस विभोरतेने विसरुनी अवघ्या वृंदावनाचे भान ||
रंगली मग ती रासक्रीडा राधा अन् कृष्णाच्या प्रेमरंगी |
न्हाता माधवाच्या प्रीत जळात , हर्षाचे तरंग मोहरुन उठले राधेच्या अंगी ||

