राहून गेलं काही...
राहून गेलं काही...
राहून गेलं काही ...
सनई चौघड्यांचा नाद ,
नक्षीदार मंडपाचा साज ,
पाऊस पडला अक्षतांचा ,
स्वप्नपक्षी उडले आज ,
दूर दूर आसमंती ...
नववधुचा साज लेवुनी ,
मी ओलांडला उंबरठा,
पाऊल पडे ना सामोरी ,
मागे पाहते वळूनी वळूनी ,
चुकल्या चुकल्या सारखे होते,
मनाचा कुठला कोपरा दुःखते,
काही विसरले तर नाही ना ,
काहीतरी राहून गेलं ना ...
आठवणी साठवेल का? डोळ्यांत,
भार पेलेल का? नाजूक पापण्यांना,
इथेच होते गोकूळ इथेच खेळले खेळ,
इथेच पुरवले हट्ट लाड बोबड्या बोलांचे,
इथेच भरवले घास चिऊ आणि काऊंचे ,
इथेच सांडलेत माणिक मोती दूडदूडू पाऊलांचे ...
पदराला बांधली गाठ अन् क्षण
ते इथेच सोडलेत का? ,
मन भरून येते अन् डोळ्यांतून सांडते,
चुकल्या चुकल्या सारखे होते,
मनाचा कुठला कोपरा दुःखते ,
विसरले तर नाही ना ,
काहीतरी राहून गेलं ना ...
सौ. मनीषा आशिष वांढरे ...
चंद्रपूर ...
