पुरुषार्थ
पुरुषार्थ
एवढं काय घाबरायचं त्याला!
पुरुषच तर आहे.
तुझ्याच कुशीतून जन्माला आलाय.
त्याचा कण न् कण तुला माहितेय.
तूच तर घडवलंयस त्याला.
तुझ्यातल्या यशोदेचा तो कान्हा,
तुझ्या राधेचा तो मनमोहन,
त्याला वरमाला घालून रुख्मिणी बनलेल्या तुझा,
तर तो द्वारकाधीशही आहे.
द्रौपदीसारखी अडचणीत आलीस,
तर लाज राखणारा कृष्णसखाही तोच.
ही सगळी त्याची रूपं, तूच घडवलीयस!
तुझ्याही नकळत, जेव्हा तुझ्याच तनामनातून जीवनरस घेऊन अगदी सूक्ष्मातून,
हळूहळू याची मूर्ती घडत होती,
अगदी त्या वेळेपासून.
पण मग असं काय घडलं,
की याचं नाव काढताच मनात सगळ्यात आधी येतो, तो सावधपणा.
प्रतिक्षिप्त क्रीयेसारखा.
घडलेल्या अनेक क्रूर घटनांचा विचार,
मग भीती, थरकाप,
असं काय होतं, की आपल्याच उपकारकर्तीचा,
तिच्या तनामनाचा विध्वंस करताना याचं मन अडखळत नाही,
चोळामोळा करून रद्दी कागदासारखं तिला फेकून देताना याचे हात जराही कापत नाहीत ?
याचं कारण आहे.
यावेळी तो विचारशक्ती संपलेला पुरुषच काय, माणूसही नसतो.
असतं एक जना
वर. पिसाळलेलं.
त्याच्या जन्मापासूनच मनाच्या एका कोपऱ्यात लपून बसलेलं.
आता तुझ्या लक्षात येतंय का ?
खाऊ पिऊ घालून या जनावरालाही तूच वाढवलंयस.
स्वत:ला कायम दुय्यम समजत,
समाजाला आपल्या तनामनाचे लचके तोडू दिलेस.
त्या तुटलेल्या तुझ्या लचक्यांवर हे जनावर पोसलंय.
तेव्हाच जाणलं असतंस स्वत:ला,
उठली असतीस संपूर्ण सामर्थ्याने उसळून,
पहिल्याच अन्यायाचा प्रतिकार केला असतास,
तर फोफावली नसती ही विषाची वेल.
अजूनही वेळ गेलेली नाही.
याचं दमन कसं करायचं, हे ही तूच ठरवणार आहेस.
तुझ्याचसाठी.
तुला ठाऊक आहे ती रीत.
तुझ्यातच तेवढं सामर्थ्य आहे.
तू रुजवू शकतेस,
तूच उखडूही शकतेस
कर ते. तुझ्यासाठी.
तूच हे रुजवलंयस,
आता उपटायचंही तूच.
उमा होऊन समजावणी होत नसेल
तर काली बनून.
याच्या मनातल्या त्या राक्षसाला संपवणं हाच उपाय आहे.
याला पुरुषार्थाचा खरा अर्थ तूच समजावून दिला पाहिजेस.
आणि जिथे,
त्याचा पुरुषार्थ कमी पडेल,
तिथे तुलाच दाखवावा लागेल,
तुझा
पुरुषार्थ.