प्रतिज्ञा प्रजासत्ताकाची...
प्रतिज्ञा प्रजासत्ताकाची...
आहोत सारे बांधव आपण, याच महान मातीचे;
पुरे की आता राजकारण, तुच्छ - उच्च जातीचे.
काय बरं मिळणार असं, आपसांतच लढून?
भूतकाळातून प्रेरणा घ्या, जरा पहा मागं वळून!
लढलो होतो जेव्हा आपण, खांद्याला - खांदा भिडून;
इंग्रजही परतले, नाही बसू शकले अडून.
जग जाते आहे पुढे, प्रगती करण्यासाठी;
आपण मात्र इथे झगडतोय, 'मागास' म्हणवून घेण्यासाठी.
करून जाळपोळ राष्ट्रीय संपत्तीची, असे काय साध्य होणार ?
पुन्हा एकदा, आपलेच हतबलतेपण जगासमोर येणार.
हवीच आहे संधी काहींना, आपल्याला पाण्यात पहाण्याची;
वेळ आहे ताकदीने, त्यांसमोर उभे ठाकण्याची.
चार भिन्न लोक एकत्र येऊनच, घडवितात समाज;
जोडतो कुणी हात फक्त, तर पडतो कुणी झुकून नमाज.
केवळ प्रतिज्ञेपुरते बांधव, आम्ही नक्कीच नाही;
प्रजासत्ताक दिनी या, देऊ या की याच एकजुटीची नवी ग्वाही!
नको आता वळण राजकारणाला जातीय,
सांगायचंय गर्वानं छाती ठोकून - 'मी, फक्त भारतीय', 'मी, फक्त भारतीय'...!
