प्रेम का करावे?
प्रेम का करावे?
खरंच वाटते प्रेम करावे!
भूतकाळातल्या बालपणावर,
विस्मरणातल्या आठवणींवर!
कारण या आठवणींवर, या वयात—
खरं बरं वाटते! अन म्हणूनच
खरंच वाटते प्रेम करावे!
तरुणपणात केलेल्या चुकांवर,
मनावर झालेल्या जखमांवर!
आजवर इतरांनी इजा केल्या,
चूका दाखवल्या, या वयात--
मनाच्या जखमा ओल्या जाहल्या,
झालेल्या चूका सुधारता आल्या,
खरंच बरे वाटले! अन म्हणूनच
खरंच वाटते प्रेम करावे!
कळत नकळत अन्याय झाला,
माझ्याकडून इतरांवर,
अन इतरांकडून माझ्यावर, या वयात--
न्याय-अन्यायाचे गणित जुळविता आले,
बाकी शून्य आली! बरं वाटले--
म्हणून खरंच वाटते प्रेम करावे!
तरुणपणात हिशोब चुकले,
अधिकाचे उणे व उण्याचे अधिक झाले
विचार करता काही न चुकले,
हाती काहीच न शिल्लक राहिले,
ऋणात तर नाही ना? बरे वाटले--
म्हणून खरंच वाटते प्रेम करावे!
ऋणात नाही, असे कसे होणार?
माझे मन मलाच म्हणाले,
मातृ, पितृ, गुरू, समाज ऋण
यातून उतराई होणे नाही!
प्रेमाने का ते शक्य नाही?
म्हणून खरंच प्रेम करावे!
अन अखंड प्रेम करीतच राहावे!!
