पंढरीचे वारकरी
पंढरीचे वारकरी
आम्ही सारे वारकरी
निघालो विठुच्या ठायी
हातामध्ये टाळ, विणा
भाव भक्तीचा हृदयी ||१||
भालावरी गंध अन्
छंद विठ्ठल नामाचा
त्याच्या नामस्मरणाने
मार्ग होईल सुखाचा ||२||
तुळस ही डोईवरी
वाटला न कधी भार
प्रवासी तुझ्या भक्तीचे
तुझा एकच आधार ||३||
जातीभेद नसे इथे
सर्वधर्म समभाव
तुझ्याच भक्तीचा असे
आमच्या मनात ठाव ||४||
वयोवृद्ध ही चालती
घेत आनंद वारीचा
सोहळा चालला असा
जसा मायेच्या भक्तीचा ||५||
विठूरायाच्या नामाने
दिंडी ही दुमदुमली
जपू वारसा वारीचा
आस मनात धरली ||६||
