फूटपाथ
फूटपाथ
कोरड्या शब्दात देती भावनांची सांत्वना
या उपाशी माणसांना योजनांची सांत्वना
पावसाने शांत झाली भाकरीची भूक ही
पावसाच्या चिंब धारा वादळांची सांत्वना
कामधंदे बंद सारे आज नाही भाकरी
देत आहे आज बाबा आसवांची सांत्वना
जीवनाचे स्वप्न आहे भंगलेले बालका
झोपलेल्या बालकांना पालकांची सांत्वना
बालकांना पाळणा ना खेळण्याला खेळणा
चांदण्यांचा दोस्त बाळा चांदण्यांची सांत्वना
धुंद चाले वाहने मद्यात त्यांची कल्पना
जीव गेला हाय बाबा डॉक्टरांची सांत्वना
फूटपाथा दोष नाही जीवनाचा खेळ हा
जाग पोरा सूर्य शोधा काजव्यांची सांत्वना
