फास
फास
नभ कोपला कोपला
नाही दिसला रे थेंब
झाली धरती वांझोटी
आटे गर्भातच कोंब //१//
नशिबाला लागलेला
दारिद्र्याचा हा अंधार
फणा काढून बसला
आहे बघा सावकार //२//
निळ्या डोंगराच्या वानी
व्याजावर व्याज चढे
काही केल्या कमी नाही
कर्जावर कर्ज वाढे //३//
मनोमनी तुटलो मी
आता घेऊ कसा श्वास
नशिबाने पळविला
माझ्या तोंडचा रे घास //४//
यमदूत बोलविती
जणू होई मला भास
असा समोर लटके
गळ्यासाठी दुष्ट फास //५//.
