पावसाळा
पावसाळा
नभ उतरू आलेत
सृष्टी जाताच झाकोळून
निळ्या नभाची निळाई
क्षणात जाईल सरुन…. /१/
देते मनास तजेला
थंड वाऱ्याची चाहूल
सौदामिनीच्या साथीने
टाकते धरेवर पाऊल... /२/
चिंब भिजवून धरतीला
गंध सुटलेली मृत्तिका
सुखावली सारी सृष्टी
डोलू लागल्या लतिका... /३/
धो धो बरसला पाऊस
छपरातही मावेना
वळचनीचे पाणी
ओंजळीत येईना... /४/
वसुंधरा नटली
हिरवा शालू नेसून
नटखट पावसाने
आसमंत गेला भिजून .../५/
