पाऊस
पाऊस
बालपणीच्या वेड्या
आठवणींना उजाळा देणारा
संगीतमय धुंदीने क्षणात समाधानाने
मन चिंब भिजवणारा असतो हा पाऊस
धुवाधार जलधारांनी मनसोक्त खेळवणारा
अलगदपणे नकळत नैराश्याला दूर पळवणारा
असतो हा पाऊस
धावपळीच्या जीवनात मनाला
विश्रांतीचा जणू निवारा देणारा
गडगडत्या स्वप्नांना पूर्ततेच्या आशेचा भास
हा खरा दाखविणारा असतो हा पाऊस
कोसळत्या सरींनी धरणीची तृष्णा मिटविणारा
टप टप धारांनी व्याकूळ मनाला तृप्त करणारा
असतो हा पाऊस
धरणीवर हिरवी चादर पसरून उल्हासाचे नवे सूर देणारा
अल्लड मनाला उत्सुकतेचे
मोह लावणारा
चाहूल लागता क्षणी सुखद ओढ निर्माण करणारा
सर्वांचा आवडता असतो हा पाऊस
चेहऱ्यावर बरसता अश्रूंना नामशेष करून त्यात मिसळविणारा
ऊन-सावली सोबतच्या खेळांनी इंद्रधनूची नवी अनुभूती देणारा असतो हा पाऊस
कवी मनाला भुरळ पाडणारा
शब्दात व्यक्त करता येत नाही
अशा बऱ्याच गोष्टी
नकळतपणे आपल्याला शिकवणारा असतो हा पाऊस..
