मराठी माऊली
मराठी माऊली
माझी मराठी माऊली
दाते अभंग भारुड
शब्द शब्द तिचा असा
जणू ज्ञानाचे कवाड
माझ्या भाषेचा संस्कार
अमृताने भिजलेला
बोली भाषेतून कसा
जनी मनी रुजलेला
भजनात कीर्तनात
हळुवार प्रकटली
ओवी अंगाई नी गाथा
घरी दारी विसावली
दरी खोऱ्यातून घुमे
तिचा आवाज रांगडा
स्वाभिमानी कणखर
जसा सह्याद्रीचा कडा
माझ्या भाषेचे कौतुक
तिच्या स्वरात गोडवा
तिचा प्राचीन वारसा
मना मनात जपावा
ठेवा अमूल्य भाषेचा
किती महती सांगावी
गाजे त्रिखंडात नाव
अभिमाने मिरवावी
महाराष्ट्र गर्जे माझा
तिचा दर्जा अभिजात
उंच फडकतो झेंडा
मराठीचा गगनात
