मित्रा
मित्रा
केलास आज कैसा पाठीत घाव मित्रा
खेळून आज गेला प्रेमात डाव मित्रा
कफ्तान तूच होता नौका कशी बुडाली
गेला बुडून माझा साराच गाव मित्रा
डोहात अंतराच्या जाऊन खोल माझ्या
जाणून भाव माझे केला लिलाव मित्रा
एकांत जीवनाचा तू दूर फार केला
घेऊ कसे तुझे मी शत्रूंत नाव मित्रा
मानून देवता मी पूजा तुझीच केली
नाही तुला कळाला हा भक्तिभाव मित्रा
विश्वात खास माझ्या विश्वासघात केला
माझ्या विरुद्ध का रे केला उठाव मित्रा
मागून घ्यावयाचा होतास प्राण माझा
मैत्री पुढे कुठे रे देहास भाव मित्रा
तो तूच मारणारा कळताच ठार झालो
मित्रास दुखवण्याचा नाही सराव मित्रा
पर्याय आज नाही मृत्यु स्विकारतो मी
मैत्रीस जागणारा माझा स्वभाव मित्रा
जाळात पेटताना भेटून जा जरासा
दावून जा जरासे खोटेच भाव मित्रा
