मी मध्यमवर्गीय
मी मध्यमवर्गीय
दिवस रात्र राबतो ,
सुखाची भाकर बायका - पोरासोबत खाया
पर रातीच निघतो ताव त्यांच्यावर,
माझ्या दिवसभराच्या लढाईचा....
तुटक चप्पल , भेगाळलेल बनेल ,
अन् ठिगळ लावलेली कापड
राबून राबून आता
हाडाची बी केल्यात बघा लाकड
सूर्याच्या आधी उठून जातो
राती पोर झोपल्यावर येतो
पोरग पहिलच दहावीत गेलं कधी
हे माझ मीच विसरतो
पोरांचं शिक्षण त्यांची हौसमौज
यात बायकोची साडी राहून जाते
रोज आमच्या साठी तीही झटते
पण या प्रपंच्याच्या गाड्यात आतून झुरत च राहते
कळत सार माझ्याही मनाला
दिसत स्वप्न कुटूबिंच्या डोळ्यातल
पण रोज किती ही केली फरपट तरी
पैक कमीच पडत पाकीटातल
म्हणते पोर चला पप्पा फिरायला जाऊ
पोरग म्हणत पप्पा मला गाडी घेऊ
काढलेल कर्ज मग दर महिन्याचा पगार नेतो
अन् या साऱ्याचा राग माझ्याच लक्ष्मी वर निघतो
घरची लक्ष्मी नाराज म्हणून
देवी ही रुसून बसते की काय
अरे दिस - रात मेहनत करून बी
मी एवढा वाईट कसा काय
बायको म्हणती चीड चीड करतो
पोरं म्हणातात बाप मला मारतो
पण रोज राती हा बाप रडतो
हे फक्त डोक्याखालचा तकिया जाणतो
खरच वाटत रे पोरांनो ,सगळ तुमच्या मनासारखं करावं
ये कांते वाटत ग ,तुला बी सार सुख द्यावं
पर किती काय केलं तरी मी कमीच पडतोय र
नाही नाही म्हणल तरी खरच आता थकलोय र
साथ हवी पोरांनो आता फकत तुमची
चिडलो, रागावलो तरी आस तुमच्या मिठीची
चटणी भाकरीचा खाताना घास, तुमच्या चेहऱ्यावर हास्याची
आणि किती बी काय झालं तरी, माझा बा हाय तुमच्या या विश्वासाची
