मी अमावस्येचा चंद्र
मी अमावस्येचा चंद्र
मी अमावस्येचा चंद्र तू रात पुनवेची,
सांग सखे जुळणार कशी प्रीत दोघांची.
तू लोळते सुखात माझी वणवण भटकंती,
मी बाभळीचा काटा तू फूल शेवंती.
मी ताग्यागत धागा तू दोरी रेशमाची,
सांग सखे जुळणार कशी प्रीत दोघांची.
तू स्वच्छंदी मैना मी बंदीवान राघू,
सांग कोणत्या मिषाने मी प्रेम तुझे मागू.
तुझ्या वेड्या हट्टापायी राख होई संसाराची,
सांग सखे जुळणार कशी प्रीत दोघांची.
तुझी आलिशान कोठी माझी झोपडी गळणारी,
कशी दिसेल तुला राणी ही वेदना जळणारी.
घे समजून प्रिये मला तू तुला शपथ ह्या जखमांची,
सांग सखे जुळणार कशी प्रीत दोघांची.