माय मराठी
माय मराठी
माझी मराठी गोजीरी
जसं बाळ लडिवाळ
जन्मोजन्मी जोडलेली
माय मराठीशी नाळ
काना,वेलांटी,उकार
शब्द सौंदर्य आगळे
पाना फुलांत इथल्या
गंध तोची दरवळे
जनाईची ओवी गोड
तुकारामाचे अभंग
मंदिरात भुपाळीचे
स्वर करी मना दंग
कोसा कोसाला बदले
मराठीची बोलीभाषा
शब्द समृद्ध करती
भाषेच्या या ज्ञानकोशा
दोहे, भारूड, लावणी
श्लोक,गौळणी,पोवाडे
किती वर्णावा गोडवा
शब्द पडती तोकडे
