माहेरची सय
माहेरची सय
1 min
189
माझ्या माहेरची सय
सय मला सताविते
घरी दळीता कांडिता
गाणे माहेरचे गाते
माझ्या माहेरच्या दारी
दारी तुळस सुंदर
तीच्या सोबतीला आहे
उभा दारात उंबर
माझ्या माहेरचा वारा
वारा कसा थंडगार
जातो अंगाला भिडून
जसा मायेचा पदर
माझ्या माहेरची माया
माया आभाळाची भासे
मन धावतं धावतं
पाखराचे पंख जसे
माझ्या माहेरची ओढ
ओढ मनाला लागली
मन व्याकुळ व्याकुळ
लय आठवण आली
