मार्ग माझा एकला
मार्ग माझा एकला
सांगत होता केविलवाणे
चूक यात ना त्याची काही
कसे कळावे त्याला आता
अंतःकरणी जागा नाही
धुडकावूनी त्याने आधी
दुःखी मजला केले होते
पुन्हा फिरुनी घाव सोसणे
का रे माझ्या नशिबी होते
ठामच होते माझी मी ही
पुढेच दृष्टी पाहत होती
मुळीच नव्हते नयनी अश्रू
नदी कोरडी झाली होती
गतकाळावर मात करावी
आता नाही मागे बघणे
एकलाच हा मार्ग चालता
हाती माझ्या तुला विसरणे