मागे वळून पाहशील का
मागे वळून पाहशील का
पाठीवर दप्तर घेऊन,
संसाराला जरा मागे ठेवून
शाळेची पायरी चढशील का
मागे वळून पाहशील का
ऑफीसची बॅग आणि
शेतातील काम
ठेवून थोडे खाली
तालासुरात बे चे पाढे म्हणायला येशील का
मागे वळून पाहशील का
मॅडमचा तास चालू असताना
शेवटच्या बाकावर बसून बोलायला
आणि ओरडा त्यांचा खायला येशील का
मागे वळून पाहशील का?
पी.टी च्या तासाला
मैदानामध्ये बालपण शोधायला
हरवून गेलेल्या बालमनाला
पुन्हा एकदा गवसायला
वळून पाहशील का ?
व्हाट्सऍप आणि फेसबुकच्या
अभासी दुनियातून बाहेर पडुन
तुटत चाललेल्या धाग्यांना पुन्हा एकदा जोडशिल का
मागे वळून पाहशिल का ?
मनाचा उबा भरलेला आहे
रिकामा करायला, मित्र मैत्रीणीची
आस आहे.
अचानक खो घालायला येशील का
मागे वळून पाहशिल का
शाळेच्या चार भिंती सोडून
आयुष्याची शाळा शिकतो आहे.
काळ्याकुट्ट फळ्यावर, पांढऱ्याखडूने
भविष्य लिहायला येशील का
मागे वळून पाहशील का ?
आज खूप मोठया हॉटेलमध्ये
जेवत असाल तुम्ही आम्ही पण
शाळेतल्या मित्रमैत्रिणी सोबतच्या
डबातल्या घासाची चव घ्यायला येशील का
मागे वळून पाहशिल का?
जबाबदारीच्या ओझाने थोडेसे दमायला झाले तुला
म्हणून म्हणते कोंडल्या भावनांना मोकळे येशील का
मागे वळून पाहशील का
आशा अपेक्षाच्या गर्दीत
खूप एकटं वाटत असेल तुला
अचानक आधाराचा पाठीवरून
हात फिरवायला येशील का
मागे वळून पाहाशिल का ?
केली दंगामस्ती पण कुणाला नाही त्रास तेवढाच केला अभ्यास
मित्र मैत्रिनीचा मिळाला प्रेमळ सहवास ,
तोच सहवास अनुभवायला येशील का
मागे वळून पाहाशिल का ?
शाळेने शिकवली शिस्त
शिक्षकांनी केले संस्कार म्हणूनच आमच्या स्वप्नांना मिळाला आकार
आजचा दिवस सत्यात झाला साकार
मागे वळून पाहशील का
आठवणीच्या जाळ्यात बालपण सरले
पहाटेच्या गजरात तरुणपण उरले
म्हणून म्हणते पुन्हा एकदा
शाळेची घंटा ऐकायला येशील का
मागे वळून पाहशील का
आयुष्याच्या वाटेवर झालो आपण वेगळे
आपआपल्या कामात गर्क असतो सगळे
कधीतरी थोडीशी पळवाट म्हणून का
असेना मला भेटायला येशील का
मागे वळून पाहशील का
