कविता
कविता
एक-एक श्वास माझा, त्या घटका मोजत होते
प्रत्येक श्वासावरती, आई तुझेच ठोके होते
जगायचे होते मजला, मी विनवणी करीत होतो
देवापुढे त्याक्षणी मग मी, गाऱ्हाणी मांडत होतो
हृदयातील हाक माझ्या, कोणीही ऐकत नव्हते.....
प्रत्येक श्वासावरती.....
आकांत पाहुनी तुमचा, मी घायाळ होत होतो
मरणाच्या गच्च मिठीतुन, स्वतःला सोडवत होतो
मरायचे नव्हते गं मला, तुमच्या मांडीवर निजायचे होते......
कोसळत होते बाबा, अन तुही खचली होती
अश्रू नयनांनी आयुष्याचा, सारीपाट वाचत होती
जमलेल्या मित्रांमध्ये मला, तुझे डोळे शोधत होते.....
शेवटची ती अंघोळ माझी, अन हळद रुसली होती
रंगबिरंगी फुलांनी, जशी शेज सजली होती
न येणारेही येऊन गेले, जसे यात्रेत निघाले होते.....
शेवटचा प्रवास माझा, सारे सोबत चालत होते
असा कोणीही उरला नव्हता, की त्याचे अश्रू गळत नव्हते
निस्तब्ध मुक्या भावनांना, ते वाचा फोडत होते.....
संपला प्रवास आता, तो क्षणही जवळ आला
दोन जीवाचा अंश, या नजरेआड गेला
जन्म दिला ज्यांनी, तेच अग्नीही देत होते.....
