क्षणभर विश्रांती
क्षणभर विश्रांती
आज क्षणभर थांबावस वाटल
माग वळून थोडं पहावस वाटल
थोडं स्वतःलाच न्याहाळावंसं वाटलं
आज क्षणभर थांबावस वाटलं
वाटलं,
तुला भेटल्यानंतर
"still we are just mates,
not on dates, okay?"
असं सांगणारी ती मीच होते का?
हं, आपण अगदी दिवस-- रात्र गप्पा मारतो
आपले विचार जुळतात वगैरे सगळं ठीक आहे
पण
आयुष्याच्या गाठी जुळायला अजुन वेळ आहे
हे सतत बजावणारी ती मीच होते का?
थोडं चाचपून पहावं वाटलं
आज क्षणभर थांबावं वाटलं
तुझ्या सोबत जगलेल्या क्षणांना
का कधी बांधता नाही आलं
याचं थोडं गणित मांडावसं वाटलं
आज क्षणभर थोडं थांबावस वाटलं
तुला आज अंगठी घालताना
आपल्या नात्याची वीण घट्ट करताना
मनी उमगलं
मधल्या काळात स्पर्शाना मिळालेले अर्थ
नात्यांना मिळालेली गोडी
आणि मला आत्तापर्यंत पडलेली
सहज सुटत जाणारी कोडी
हे सारं तुझ्याशिवाय व्यर्थ
तेव्हा मात्र या क्षणांना थांबवावंसं वाटलं
जुळणाऱ्या नात्यांची
आणि मिळणाऱ्या गोत्यांची
घट्ट वीण गुंफावीशी वाटली
आज क्षणभर थांबावंसं वाटलं
