असा कसा तू?
असा कसा तू?
असा कसा रे तू?
सागरातल्या माशासारखा,
पाण्यात राहूनही कोरडाच राहीलास!
तुझ्या इस्त्रीच्या कपड्यांवर,
आठवणींची एकही चुणी नाही
धुंद होऊन रंगपंचमी खेळलास,
पण तुझ्या अंगावर रंगाचा टिपूस नाही
कसं जमतं तुला हे सारं?
तुला माहीत आहे?
तू विचारायचास,
कधी भेटतेस?
मोरपंखी वेदना फुलायची माझ्या हृदयात,
माझ्या इवल्याशा हृदयाची स्पंदनं
पाखरं होऊन दशदिशांना उधळायची
अजुनही कधी कधी आभाळ भरुन येतं,
वाटतं वाटतं आत्ता कोसळेल,
पण पण त्याला शपथ घातलीय,
कायम हसतमुख राहण्याची़...