क्षितीजाचा उंबरठा
क्षितीजाचा उंबरठा
अपेक्षांच्या क्षितीजाने पळविले आयुष्यभर
क्षितीज पूर्तीची आस सदा मनी
पोहचता क्षितीजाच्या उंबरी
मोदाने भारावले त्याच क्षणी
अथांग निलांबर , एका बाजूला
दुजीकडे पसरलेली अवनी
मनोहर सुंदर रूप तियेचे
पाहूनिया आनंदले मनोमनी
स्थितप्रज्ञ भासती, ऊतुंग पहाड.
शुभ्र दुग्ध जलांचे तयात झरे.
लहान मोठी तुडुंब जलाशये
अवर्णनीय रुप वसुधेचे , हेच खरे
पृथ्वीच्या गोल आकाराने
भासे भेटली अवनी नभास
क्षितीज असे वदती जन तयास
पण असतो ह्या रेषेचा अभास
होता अस्त - उदय रवीचा
रंग सुंदर क्षितिजावर उमटती
तसेच चढ उतार येती जीवनी
घेत भरारी चालावे जगती
तडजोड काही अपेक्षांची
काहीची सहजच पूर्तता
मनी बाळगता समाधान
राखावी कुटुंबी कार्य दक्षता