कोरा सातबारा..!
कोरा सातबारा..!
आवरून ज्याची त्याने
केली पेरणी सुगीची
उगा करुन ठेवली
मशागत मी शेतीची...!
घातलें बॅंकेत खेटें
हीं सातबारा घेवूनी
हाकून लाविलें तेव्हां
मला डोळे वटारूनीं...!
सारलीं कशीबशी हों
पेरणी केली उधारीं
जग फोडतें फटाकें
सावकार माझ्या दारीं...!
राबलो उन्हात वेडा
मनीं आस हीं धरूनी
नेलें खुडून कणसें
त्या रात्रीस चोरट्यांनी..!
बसलें मिटून डोळे
बगळें नेम करुनीं
दिसतीं दुरून जसें
संन्यासी लागले ध्यानी..!
राबतों काबाड येथें
खळें सावडतों कुणी
शिवून भारींचे जोडे
चांभार तो अनवाणी...!
मांडीला असा कसा रें
विश्वात या खेळ भारीं
जो उजवितो धरेला
तो शेतकरी भिकारी..!
आता कशी कुठें येतें
पश्चात तीं बुध्दी कामी
गाळून घाम तो सारा
माझी कणगी रिकामी..!
