कन्यादान श्रेष्ठ दान
कन्यादान श्रेष्ठ दान
दान हा असे धर्म
केल्याने लाभते पुण्य
जो नाही दानशूर
किंमत त्याची शून्य
दानाचे प्रकार अनेक
अन्नदान जलदान
जो करी आनंदाने
मिळे त्याला मान
दानशूर तो कर्ण
आजही राहतो लक्षात
दानाने वाढतात सद्गुण
लक्ष्मी येते घरात
भुकेल्याला द्यावे अन्न
तहानलेल्या पाणी
जगात श्रेष्ठ कन्यादान
नाही अजून काही
कन्यादान करण्यास
दगडाचे काळीज लागते
पाझर फुटेल दगडांनाही
कन्यादान डोळा पाणी आणते
अंगाखांद्यावर खेळलेली मुलगी
सोपवली जाते दुसऱ्यांकडे
आसवे थांबत नाही आईचे
तुटते बापाचे आतडे
कन्यादानाचा प्रसंग
फार नाजूक असतो
थरथरत्या हाताच्या बापाची
तो परीक्षा पाहतो
"सांभाळा आमच्या लेकीला
जपले तळहाताच्या फोडाप्रमाणे
आश्वासन देतो तुम्हाला
घर उजळेल तुमचे आनंदाने"
आई बापाचे अश्रू
पडतात मुलीच्या हातावर
गहिवरते ती
अश्रू ओघळतात गालावर
बालपणीच्या आठवणी
समोर उभ्या ठाकतात
"असू आम्ही सोबत कायम"
त्या मुलीची पाठ राखतात
असे हे कर्तव्य
सगळे फिके पडतील दान
महती याची थोर
असे हे कन्यादान
