खेळ हा न्यारा...
खेळ हा न्यारा...
काल संध्याकाळी सिनेमा पाहत बसले होते,,कधी कधी ,,काही छंद हे अलगदपणे मनाचा कौल घेणारे असतात.त्यामुळे समोर चालू असलेला सिनेमा पाहण्याचा मोह अनावर झाला आणि त्यातच तो प्रचंड आवडणाऱ्या चित्रपटांच्या यादीपैकी एक म्हटल्यावर तर उत्साह बघायलाच नको होता..सिनेमाचं नाव होतं "अभिमान"...अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला..कसे असते ना ह्या व्यक्ती ना ओळखीच्या असतात ना कधी प्रत्यक्षात पाहिलेल्या असतात पण तरीही त्या आपल्या जीवनात एका कोपऱ्यात सामावलेल्या असतात..मला आठवतं बी.ए.च्या तृतीय वर्षाच्या इंग्लिश लिटरेचरच्या एका लेक्चरला प्राध्यापकांनी द ग्रेट गॅट्सबी कादंबरी शिकवायला सुरुवात केली आणि प्रस्तावनेतच अँग्री यंग मॅन चा उल्लेख केला.."कोणी सांगेल का म्हणजे काय?"असा प्रश्न केल्यावर मी फक्त दोन शब्दात माझं उत्तर दिलं होतं...निम्म्याहून जास्त प्रमाणात हशा पिकला होता..बाकी 'हिने कशी हिम्मत केली बोलायची' हे पाहून माझ्या चेहऱ्याकडे बघत होते.."अमिताभ बच्चन"असे आणि इतकेच उत्तर होते..पण अनपेक्षित गोष्टींनी भरलेली कुपी म्हणजे जीवन...कधी काय होईल सांगताच येत नाही.."Excellent"...प्राध्यापकांची प्रतिक्रिया ऐकून श्रावणात येणारी सर गोंधळ करते तितक्याच वेगात ती थांबल्यावर कशी शांतता पसरते तशी शांतता वर्गात पसरली होती..हसणाऱ्या चेहऱ्यावर प्रश्न ठेऊन हशा निघून गेला होता..माझं अपेक्षित उत्तर मला काय देऊन गेलं काय नाही हे महत्वाचे नाही पण अमिताभ बच्चन या व्यक्तीविषयी जिव्हाळा नक्कीच निर्माण करून गेलं..शक्यतोवर त्यांच्या सिनेमांना प्राधान्य देऊन त्यांनी माझ्यासाठी तो एक क्षण सन्मानाचा दिला होता याची परतफेड करतेच मी..कालही तेच केलं...अभिमान पहिला पूर्ण..शेवटपर्यंत...
कथानक छोटंसं आहे..नवरा...बायको...आणि अभिमान...पाहताक्षणी नायिकेच्या प्रेमात पडलेला नायक हा गायक म्हणून यशाच्या अत्युच्च स्थानावर विराजमान असलेला असूनही एका सामान्य मुलीशी विवाह करतो..अर्थात नानाविध प्रलोभने, पर्याय होते त्याच्यासमोर पण म्हणतात ना ...ते आंधळं वगैरे प्रेम बीम का काय ते..तसेच काहीसे होते आणि एक शांत, सोज्वळ, लाजाळू नायिका या नायकाच्या आयुष्यात पत्नी बनून येते.. एका पार्टीमध्ये युगुलगीत गाऊन नायिका तिच्या आवाजाची झलक लोकांना दाखवते..त्यामुळे नायक आणखीनच सातव्या आस्मानावर पाऊल टाकल्याच्या आवेशात तिलाही सिनेमाची गायिका बनवण्यासाठी प्रयत्न सुरु करतो..पुढे तीही एक अति यशस्वी गायिका बनते..परंतु काळाने अत्यंत चपखलपणे गिरकी घ्यावी तशी परिस्थितीच्या भोवऱ्यात ही दोन्हीही पती पत्नी अडकतात..ज्या यशाच्या परमोच्च ठिकाणावर नायकाचं नाव कोरलं गेलं होतं तिथे आता नायिकेचे नाव होते आणि नायकाची पीछेहाट होते...मग येतो अभिमान...अमूर्त स्वरूपात असलेला सिनेमातील खलनायक...आणि मग दोन जीवांची व्हायची ती वाताहत होते आणि शेवटी मग पुन्हा एकत्र येतात...झालं सिनेमा संपतो...
टी.व्ही. बंद होतो आणि मग मात्र सुरू होतो माझ्या मनातील अभिमान सिनेमा..प्रत्यक्षात सिनेमा दोन तासात संपून गेलाही पण मनातील सिनेमा अजूनही मनाच्या पटलावर तरंग लहरी निर्माण करत आहे...अविरत येणाऱ्या लाटेसारखी प्रत्येक लहर वेगवेगळ्या विचारांचे शिंपले काठावर फेकत आहे...निव्वळ मनोरंजन इतकाच उदात्त हेतू मनाला अजिबात मान्य झाला नाही..या सिनेमात जे काही घडलं ते का? कशामुळे?कोण जबाबदार?? कोण प्रायश्चित्त घेणार? या सगळ्या उत्तरांच्या गुंत्यात अडकून पडले आहे..
माणूस हा प्राणीच एका आगळ्यावेगळ्या धाटणीचा आहे. त्याच्या या विचारमंथनाला ना काळाची बंधने असतात ना परिस्थितीचे भान..सदैव, अविरत चालू असते ही संवेदनांची घालमेल. माझंही तसेच झाले, हा निव्वळ एक सिनेमा जरी असला तरी कथानक काही फक्त मनोरंजन सुचवणारे नव्हते..त्या दोघांच्याही अतूट अशा वाटणाऱ्या प्रीतीला तडा घालवणारा हा 'अभिमान' त्यांच्यात आला कुठून?? सात जन्माच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणतात, मग सहज सुटणारा बंध त्यांच्यात येतो कुठून??जन्मांतरीच्या सोबतीसाठी आणाभाका घेऊन, पवित्र मंत्रोच्चाराच्या साक्षीने बांधलेल्या या नात्यांना...कुणीतरी...
दोन दिसांची सगळी नाती
कुणी न उरे अंती सोबती...
.....या पैलतीरावर का नेऊन ठेवलं जातं ?? कोणाच्याही मनात नसताना हे कसं घडतं?? का घडतं??
अवघ्या काही मिनिटांमध्ये ...काही विचारायचं आहे का तुला, मोकळेपणाने विचार नंतर संभ्रम नको??? असा प्रश्न मुलीला केला जातो..आणि तिच्या मतप्रदर्शनाच्या स्वातंत्र्याला मोकळीक दिली जाते...त्या वेळेला त्या मुलीला प्रश्न करणारा हा उपवर मुलगा आणि त्याचे उदात्त विचार यांचे किती अप्रूप वाटते त्या मुलीला..आणि मग ओघानेच भाळून गेल्यासारखे वाटून ती जरी 'नाही' असे उत्तर देऊन गेली असली तरीही तिच्या अंतर्मनात दाबून ठेवलेल्या असंख्य प्रश्नांना ती निरुत्तर करू शकते का??नाही..आयुष्यभर ती त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा अपयशी प्रयास करत राहते ..मग हे असे का घडते??
अगदी असेच ज्या उदात्त विचारांचा दिखावा करून खोट्या आश्वासनांवर नाती उभारण्यात यश मिळवलेल्या व्यक्तींचीही काही कसर नसते..अशा लोकांच्या मनमानीला प्रतिबंध करणारी कुठलीही यंत्रणा कार्यान्वित नसते मग जी वाढत जाते ती यांची मुजोरी...याला जबाबदार कोण??
दुनियेत अगणित समस्या विनाकारण नसतील ना उदभवल्या..पण त्यांनी हातपाय पसरावेत असेही कोणी भाकीत केले नसेल ना ..मग का ???
तेंव्हा एकच मतितार्थ मला लाभला ...हे ...सर्व कर्ताकरविता ...कोणी तरी औरच असेल...मग हे जीव कोण आहेत..निव्वळ एक कठपुतली...दैवाच्या हातची...नियतीच्या लेखणीने कथित झालेली...कर्माच्या खांद्यावर विराजून येणारी...ही कठपुतली जीवन जगण्याची कसरत, करामत करून दाखवत असते.. अगदी लाचारीने...अगतिकतेने..बंध तुटण्याचा प्रश्नच नसतो..
तो जपावाच लागतो, त्या कठपुतलीला..संपूर्ण आयुष्यच तर गुरफटलेले असते त्या धाग्यांमध्ये...कलाकार बनून राहतो आपण..आणि "तो"...मात्र बनतो एक सर्वशक्तिमान दिग्दर्शक...रंगमंच ही त्याचाच..कथा ही त्याचीच..नाचतो मात्र माणूस..बोटांच्या इशाऱ्यातच मग जीवनयात्रा बद्ध होऊन बसते..कुठलीही औपचारिकता न बाळगता..
मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरेही मिळून जातात....
तुझे सर्वरंगी रूप, उदारा,
कळले सांग कुणाला ?
खेळ तुझा न्यारा, प्रभु रे,
खेळ तुझा न्यारा !
