कैफियत
कैफियत
वामन रुपी वृत्ती ने
दिला पाय मस्तकावर
अन संपवले बळीचेचं अस्तित्व
मायबाप सरकार म्हणतो
आम्ही, तरीही दरिद्री म्हणून
हिनवता ना ओ तुम्हीच
लाखांचा पोशिंदा, म्हणता खरं
पण आमचंच पोट खपाटिला
आमच्या डोळ्यातलं पाणी
केव्हाच आटलंय, आमच्या कोरड्या
पडलेल्या विहिरी वानी
आमचं जीवन जणू झालंय
निराशेची चाळणी, आमच्या
अंगातल्या बंडी सारखीच
नजर गेलीय खोलवर
कुठंतरी ओलावा मिळेल या आशेवर,
या पायाला पडलेल्या भेगांचं
काय कौतुक? , ह्या भेगाळलेल्या
जमिनीचा आरसाच जणू
आमची गुरं -ढोरं पण
आता खिल्लारी नाही राहिलीत
त्यांना खायला चारा पाणी नाही
म्हणून कसायाला धार्जीन झालीत
पोटच्या लेकरांना अर्ध पोटी ठेऊन
कसा होईन चांगला बाप मी?
कशाचा हक्क, आणि कशाचं कर्तव्य
बायको च्या कुंकवात ही भेसळ सगळी
त्याच्या लालीतली गर्मीचं आटली
तिचे हात अजूनही बोडके चं
अन लंके ची पार्वती झाली
लेकीला सुख मिळेना
अन घरातली लक्ष्मी हसेना
सांगा कुणाच्या दरबारात न्याय
मागू मी
कष्टकरी हातानं, हिशेब का करू नाही
कास्तकाराच्या पोरानं
साहेब का होऊ नाई ?
स्वातंत्र्या साठी लढले बापजादे
पण ह्या स्वातंत्र्याची ऐशी तैशी झाली
जमिनी चा मालक मी, पन
मजुरी नशिबी आली
माझ्या शेतमालाची अशी नास धूस झाली
आभाळ फाटलं , वाली ना उरला कोणी
कुठं कैफियत मांडू, सांगा आता तुम्ही?
कोण ऐकेल कैफियत माझी
कुणा कैफियत सांगू मी !!
