जीवन गाणे गातच रहावे
जीवन गाणे गातच रहावे
नव जन्माच्या रडण्याच्या आवाजाने जे तराने सुरू व्हावे
आईच्या मायेच्या स्पर्शाने ज्या कथेचे सार निर्मळ व्हावे
वडिलांच्या काळजीने ज्या कहाणीत सप्तरंगांचे इंद्रधनू दिसावे
आजी आजोबांच्या संगतीने ज्या लहानपणात सुगंध खुलावे
असे हे सुरेल खंड वाढतच राहवे,
जीवन गाणे गातच राहवे........
आईच्या दुधाचे पोषण घेऊन रोग-संसर्गांपासुन प्राण सोडवावे
तहान भागवण्याचे जल हे साधन, श्वसनाचे वायू आधार असे महत्त्व कळावे
गोड, आंबट, तिखट, तुरट, खारट, नीरस, रसाळ असे चविंचे ज्ञान उत्तेजीत व्हावे
जिभेला या लज्जत-रूचीहिंतेचे, नाकाला सुगंध-दुर्गंध वासाचे अंतर समजावे
असे हे परिवर्तनशील जग डोळ्यांना सुंदर जाणवत राहवे,
जीवन गाणे गातच राहवे........
कधी रडून, कधी हसून, कधी डोळ्याने, कधी स्पर्शाने,
कधी गप्प राहून बोलणाऱ्या मनाने शब्द उद्गारणे शिकावे
गादीच्या आलिंगणातून उतरून असे गुडघे चालत निसटावे
ममत्वाचे बोट धरून स्वतःच्या बळावर चालणे शिकावे
असे हे पाऊल स्वच्छंदाने न थकता पळतच राहवे,
जीवन गाणे गातच राहवे........
आपल्यांच्या सौख्यात नांदणाऱ्या बाळाने परक्यांच्या सानिध्यात यावे
मित्र-मैत्रिणींच्या संगतीने शिक्षणासह जगात योग्यतेने वावरण्याचे धडे घ्यावे
आई-वडील, नातेवाइकांच्या आशिर्वादासह शिक्षकांचे मार्गदर्शन ही लाभावे
खेळ, भांडणं, मैत्री, गणित, विज्ञान, विविध भाषांचे आकलन करावे
असे हे अनुभवांचे चक्र वर्षांनुवर्षे फिरतच राहवे,
जीवन गाणे गातच राहवे........
हसत-खेळत, शिकत-शिकवत, हरत-जिंकत पाखरावनी जीवनाचे आस्वाद घ्यावे
कधी आनंदी-संतोषी होऊन कृतज्ञ तर कधीमधी दुःखाने खिन्न ही व्हावे
वाईट संगतीतून स्वतःची सुटका करून संस्कारांची छाप पाडत सन्मान ही वाढवावे
जीवनाच्या कडू-गोड क्षणांचा आस्वाद घेत अनमोल असे व्यक्तिमत्त्व रेखटावे
असे हे पौगंडावस्थेतील नाजूक वळण योग्य दिशेने लक्षावे,
जीवन गाणे गातच राहवे........
शिकून-सवरून ज्ञान अवलोकान करून सज्जन व्यक्तिमत्त्व असे हे घडावे
फकस्त कुटुंबच नव्हे तर समाजाचे नाव उज्ज्वल करण्याचे दायित्व अंगी घ्यावे
लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष कुठलाही भेद न पाळता समानतेने जगावे
असत्य-अन्यायाशी संपर्क तोडून सत्यच नव्हे तर सन्मार्गावर राहण्याचे दृष्टीकोन ठेवावे
असे हे परोपकारी प्रवृत्तीचे आयुष्य शेवटच्या क्षणापर्यंत जगावे,
जीवन गाणे गातच राहवे........
