मी काय लिहू शकते
मी काय लिहू शकते


माझ्या लेखणीच्या प्रेमात पडलेला तो,
एकदा विचारता झाला मला,
म्हणे, "तू कसं इतकं सुंदर लिहितेस..?
गलातल्या गालात इतकं कसं छान हसतेस?"
उत्तरालाच जेव्हा पडला प्रश्न,
मी कसं उत्तरावं प्रश्नाला त्या..?
तुझ्यावर शब्द उधळताना सढळ होणारं मन,
तुझ्या प्रश्नानं मात्र क्षणभर बिथरलं,
तुला शब्दांत धरताना त्याचा उसवला एक धागा..
खरंच का प्रश्न आहे हा साधा..?
मी कसं लिहू शकतेपेक्षा मी काय बरं लिहू शकते..?
मी लिहू शकते...
तुझ्या रंगावर, तुझ्या ढंगावर,
मी लिहू शकते तुझ्या अंतरंगावर.
मी लिहू शकत
े...
तुझ्या डोळ्यांवर, तुझ्या ओठांवर,
अन् ओठांतून झडणाऱ्या मूक कळ्यांवर.
मी लिहू शकते...
तुझ्या नसण्यावर, तुझ्या असण्यावर,
अन् तू असताना तुझ्यात हरविलेल्या माझ्यावर.
मी लिहू शकते...
तुझ्या येण्यावर, तुझ्या जाण्यावर,
अन् तू जाताना हवेत विरलेल्या माझ्या क्षणांवर.
मी लिहू शकते...
तुझ्या बोलण्यावर, तुझ्या हसण्यावर,
अन् तू न गायलेल्या गाण्यावरसुध्दा.
तूच दिलेल्या लेखणीत माझ्या,
खंड कधी न पडावा...
मनाच्या लेखणीतून माझ्या,
अविरत तूच पाझरत रहावा.
अविरत तूच पाझरत रहावा...!