हरवलेले क्षण
हरवलेले क्षण
चिव चिव करीत आली
चिऊ माझ्या अंगणी
डोळयासमोर तरळत
येती बालपणी च्या आठवणी।
बालपणी खेळता भातुकली
देई आई शेव चकली
चोचीत घेऊनी चकली
चिऊ भुरकन उडाली।
लपंडाव, लगोरी खेळूनी
कधीच नाही दमलो
दोन्ही ढोपरे जखमी असली
तरी आनंदाने नाचलो।
अभ्यासाचा येई कंटाळा
तरीही वाटे जावे शाळा
एकमेकांच्या डब्यातील खाऊ
खाऊनी लुटावा जसा गोपाळ काला।
झुकझुक करीत चाले
बालपणाची गाडी
कळलेच नाही
कधी पकडली तारूण्याची गाडी।
बालपण म्हणजे असते
निरागस वेडे मन
पुन्हा येतील का
आयुष्यातील हे हरवलेले क्षण।
