दान
दान
तळपत्या बापाच्या तेजात
विचारांच्या मेघात, बसे तो सूतपुत्र।
सळसळत्या तारुण्याच्या वेषात,
शांत नदीच्या किनाऱ्याकाठी
सोडवितो आपले जन्म सूत्र।
द्रौपदी स्वयंवरात, द्रोणाचार्यांच्या शिष्यात,
सूतपुत्र म्हणूनी करती उपेक्षा।
उत्तम धनुर्धारी म्हणून जाणतो
जगदीश्वर त्यास अर्जुनापेक्षा।
दानी दानी म्हणूनी घेती सर्व परिक्षा
कवचकुंडले दान करूनी, तोडल्या पितृप्रेमाच्या कक्षा।
आयुष्यभर उभी केली, दानाची रास
मातृप्रेमाची होती काळजात, एकच आस।
अकस्मात आली गाढनिशेला,
चाहूल मंद हुंदक्याची,
मातृत्वाच्या आसवांनी फोडली,
विचार निद्रा कर्णाची।
थरथरत्या आशिर्वादाचा स्पर्श कुंतीचा,
आसुसलेल्या ह्रदयात ,हर्ष मायेचा।
दान मागाया आली, पंडूपुत्रजीवासाठी मातोश्री,
दानचारीत्र्याची करावी
सूतपुत्राने इथेच इतिश्री।
