हरवलेले बालपण
हरवलेले बालपण
हरवुन गेले, बालपण आठवते
का मोठा झालो, मन खंतावते
भातुकलीचा खेळ खेळता
संसार सुरु झाला खरा
बाहुला बाहुलीचे लग्न लावता
नवरा मिळाला खरा
आईने शिवलेले खणाचे परकर पोलके
घालुन मोठी झाली खरी
साडी नेसायला लागले
नाही समजले कधी
दादाचे बंडी सदरा फाटायचे कसे
हे गणित उमजले
लुटुपुटीच्या मारामारीत
दादाने दिला रट्टा गुद्दा
बालपण परत कसे येइल
हा मोठा मुद्दा
संसाराचा तोल सांभाळतांना आले मोठेपण
चिंता, काळजी, जबाबदारीने
हरवले ते बालपण
चालता चालता बाबांनी
घेतले कडेवर
बकोटीला धरुन कधी
फरपटत आणले बाजाराच्या रस्त्यावर
सगळे बालपण आठवते
पाणी येते डोळ्यात
देवाघरी गेले आजोबा
पुजा करतांना पुन्हा
कधी दिसतील सोवळ्यात
डोळे मिचकावत
प्रसाद खायचा चोरुन
आजी तु तरी येग
गोष्टी सांगायला देवाघरुन