हरि तूं निष्ठ
हरि तूं निष्ठ
हरि तूं निष्ठ निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥१॥
घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥
नळा दमयंतीचा योग । बिघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणें ही बोलती ॥२॥
राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मास तयाचें ॥३॥
कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें दांत तयाचे ॥४॥
बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळीं घातला ॥५॥
श्रियाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी । मारविलें करीं । त्याचें बाळ त्याहातीं ॥६॥
तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं पुढती । तुका म्हणे करिसी तें ॥७॥
