हापूस
हापूस
तिने खसखस फियोमाचा फेस केला
हळुवारपणे चेहऱ्याला लावला
विसरून गेली गालांवर मारलेल्या
कित्येक चापट्या
त्याचा कानात घुमणारा 'थाडकन' आवाज
विसरूनच गेली सारे सारे
संसार
नवरा
मुलं
घर
संपलेला किराणा
संपत आलेला पैसा
नि कावलेला जीव
डोळ्यांतले पाणीही
मारले पाण्याचे भरपूर सपकारे
चेहऱ्यावर
कानशीलांवर
गळ्यावर
मानेवर
फेकून दिली घरंगळलेली टिकली
राहू दिले केसांवर पाण्याचे तुषार
आता सारे सारे
खरेच सारे विस्मरणात गेले होते
स्मृतिभ्रंशाच्या त्या निर्मोही अवस्थेत
घेतला तिने मनभरून
फियोमाचा सुवास
आत आत ओढले त्या सुगंधी लहरींना
नि हृदयात उमलू दिले
काही गुलाब
जुनाट मॉड्युलर किचनच्या कप्प्यातून
सटकन खेचली एक पिशवी
बेधडक उचलली बंद पडणाऱ्या दुचाकीची चाबी
मारली एक किक
अन्
निघाली हापूस आणायला
आता बाजारातली रंगीत गर्दी तिची होती !
