गुढीमाता माऊलीचा उदो उदो
गुढीमाता माऊलीचा उदो उदो
उदो बोला उदो, गुढी माता माऊलीचा हो !! 2 वेळा
उदो कारे गर्जती सारे महिमा वर्णू तिचा हो! 2वेळा
उदो बोला उदो गुढी माता माऊलीचा हो!!ध्रु!!
चैत्र शुद्ध प्रतिपदेला दारी उभारती गुढी हो,
अमंगलाचा नाश करून प्रभुराम अवतरले हो,
विजय आणि समृद्धीचे गुढी असे प्रतीक हो,
उदो बोला उदो गुढी माता माऊलीचा हो!! १!!
ब्रह्मदेवाने केली सुंदर विश्वाची निर्मिती हो, पाडव्यादिवशी झाली सत्ययुगाची सुरुवात हो,
शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस असे हो,
उदो बोला उदो गुढी माता माऊलीचा हो...... !!२!!
उंच बांबूच्या गाठीला कडूनिंबाची डहाळी हो,
रेशीमी वस्त्रासवे वाहती गंध, अक्षता, फुले हो, गोडाच्या नैवेद्यासह देती नववर्षाच्या शुभेच्छा हो,
उदो बोला उदो गुढी माता माऊलीचा हो..... !!३!!
शंकरपार्वतीचे लग्न पाडव्यादिवशी ठरले हो,
आरोग्यदृष्ट्या कडूनिंब असे खूप गुणकारी हो,
प्रातःकाळी करता सेवन औषधी गुण मिळती हो,
उदो बोला उदो गुढी माता माऊलीचा हो!!४!!
साडेतीन मुहूर्तांत असे, मानाचा गुढीपाडवा हो,
नवीन उपक्रम,सुवर्णखरेदी लक्ष्मीपूजन करती हो,
नव चैत्रपालवी सवे नव पर्वाची उत्पत्ती हो,
उदो बोला उदो गुढी माता माऊलीचा हो!!५!!
उदो कारे गर्जती सारे महिमा वर्णू तिचा हो,
उदो बोला उदो गुढी माता माऊलीचा हो!!!
