एकांत
एकांत
सागराच्या वाहणाऱ्या मंदलाटा शांत आहे
अंतरीच्या वादळांचा वाढला आकांत आहे
होत मी घायाळ आहे जीवनाशी झुंजताना
वास्तवाशी भांडतांना ना कशाची भ्रांत आहे
नाचतो पार्टीत कोणी झोपतो रस्त्यात कोणी
हा कुणाचा जीवनाचा वेगळा सिद्धांत आहे
भांडणाने जीव गेले लाख मोलाचे तरीही
ते म्हणाले आमचा तो जिंकलेला प्रांत आहे
दोन भाऊ बोलले ना एकमेकांशी कधीही
वावराच्या वाटणीने आखला सीमांत आहे
साजणीच्या निर्णयाने थांबला हा श्वास माझा
धर्मजातीनेच केला आमचा प्रेमांत आहे
मित्र नाही आज कोणी फक्त पैसा बोलतो हा
मागणारा लाच झाला आज लक्ष्मीकांत आहे
जीव गेला आमचा कामात त्यांच्या राबताना
शेठ मालामाल झाला आमचा देहांत आहे
कंठ माझा कापला बोलायचे आता कसे मी
बोलण्यापेक्षा कुणाशी लाडका एकांत आहे
