धरणी मातेची हाक ऐका
धरणी मातेची हाक ऐका
धरणी मातेची हाक.....
थाटला संसार उघड्यावर, लाभली आभाळाची छाया
नसे तिजोरी ना संरक्षण, नियतीवर चालते काया...
पक्षी-प्राणी हा संसार, वानोळा चारे सर्वांना
उरलेली भागवी भूक, फाटक्या या घरबारानं... || १ ||
धरणी मातेची हाक ऐका, झाडांना जीवंत ठेवा,
तहानलेल्या या मातीला, मायेचा घोट द्या.
शेतकरी मी उदार मनाचा, हाल माझे क्षणोक्षण
पाणी पाणी म्हणे हा जीव, काहीली झाली अंगाची जणू...
लोभाने नको तोडू झाडे, डोळे उघडून बघ जरा
तहानली ही धरणीमाय, हिचे दुःख समजून घे जरा... || २ ||
धरणी मातेची हाक ऐका, झाडांना जीवंत ठेवा,
तहानलेल्या या मातीला, मायेचा घोट द्या.
झाडाअभावी उद्या सांग, श्वास तरी भेटेल का?
महागाईच्या या भडक्यात, माणूस-जनावरे जगतील का?
आधीच सुटत नाही फास, गळ्याचा तो दोर आवळतोस कशाला?
नको तोडू झाडे, नका लावू वाट, निसर्गाच्या या गाड्याला... || ३ ||
धरणी मातेची हाक ऐका, झाडांना जीवंत ठेवा,
तहानलेल्या या मातीला, मायेचा घोट द्या.
सरतेशेवटी या जगातून, सर्वांनाच तर जायचं आहे
आपला मुक्काम थोडासाच, इथे कुणाला राहायचं आहे?
पाणी प्यायचं, चारा खायचा, आणि एक दिवस उडून जायचं...
ठेव झाडे जिवंत आता, आम्हाला सुखाचा घास खावूदे... || ४ ||
धरणी मातेची हाक ऐका, झाडांना जीवंत ठेवा,
तहानलेल्या या मातीला, मायेचा घोट द्या.
कवी कलीम शेख
