चारूगात्री
चारूगात्री
इथे शांत एकांत, ये चारूगात्री,
तुझ्या दर्शना, थांबला एक यात्री || धृ. ||
कुणी घातली साद, ऐकून जाग,
धुळीसारखी, प्रीत तुडवू नको गं,
किती रंगवू नाट्य, मी एकपात्री || १ ||
तुझ्या आठवांनीच, कोकिळ गाते,
नभी चांदणे, ऐन रंगात येते,
फुलावे असे रोज रोमांच गात्री || २ ||
तुझ्या पैंजणांना, असे दुष्ट छंद,
छळावे, जुळावे परि प्रीतीबंध,
भिजे आसवांनी, नभी चांदरात्री || ३ ||
पहा पाकळ्यांचा, सडा शिंपीला मी,
तुझ्या स्वागताला, कधीचा खडा मी,
आता जाऊ दे, भेट स्वप्नांत रात्री || ४ ||
पुन्हा भेट, वा काही भेटू नको गं,
नजर भेटीची, वाट अडवू नको गं,
सखे दान देऊन, जा तू सपात्री || ५ ||
